राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचितच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.
मुंबई, दि. २६ ऑक्टोबर
काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज राज्यातील विविध भागातील राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मनसे या पक्षातून शेकडो कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या उपस्थितीत काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे पार पडला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस, सुलतान सिद्दीकी यांच्यासह भिवंडी येथील त्यांचे शेकडो कार्यकर्ते तसेच मनसेचे राजेंद्र रेड्डी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नांदेड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या रेखाताई बनसोडे व त्यांचे कार्यकर्ते तसेच जालना जिल्ह्यातील सरंपच परिषदेचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ यांनीही सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
“भिवंडी शहर हे वस्त्रोद्योगाचे शहर म्हणून ओळखले जाते पण या शहराची ही ओळख कायमस्वरुपी संपवण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. भिवंडीचा पॉवर लूमचा व्यवसाय संकटात आहे, तो संपला की हजारो लोकांचे रोजगार जातील, बेकारी वाढेल व शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होईल पण भाजपा सरकारला त्याचे काहीही देणेघेणे नाही. काही लोक केवळ भाषण देऊन तुमची दिशाभूल करतील त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, भाषणाने राशन मिळत नाही हे लक्षात ठेवा. काँग्रेस पक्षच देशाला तारु शकतो म्हणून काँग्रेस विचारधारेवर विश्वास ठेवत विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात केला आहे. देशाला वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी काम करावे व भिवंडीसह राज्यात सर्व ठिकाणी काँग्रेसचा तिरंगा झेंडा फडकेल त्यासाठी काम करा” असे आवाहन करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
“देश आज बिकट परिस्थितीतून जात आहे, देशाच्या सीमा सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अर्थव्यवस्था ढासळलेली आहे, शेतकरी, कामगार, तरुणवर्ग संकटात आहे. देशातील परिस्थिती बिघडलेली असली तरी पंतप्रधान मोदी मात्र स्वतःचा फोटो टीव्हीवर व पेपरमध्ये येईल एवढेच काम करतात. पंतप्रधान मोदी हे खोटे बोलण्याची मशीन आहे, सातत्याने खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. काँग्रेसला सत्ता नवीन नाही, सत्तेसाठी काँग्रेस पक्ष नाही तर देशासाठी काँग्रेस पक्ष आहे. भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळवून देऊन जगात राष्ट्र म्हणून उभे केले आहे. काँग्रेस पक्ष देश वाचवण्याची लढाई लढत आहे, या लढाईत सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. आता केवळ चार महिन्यांचा कालावधी बाकी आहे त्यानंतर केंद्रात व राज्यातही सत्ता बदल झाल्याशिवाय राहणार नाही”, असा विश्वास प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी खासदार सुरेश टावरे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, राणी अग्रवाल, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे भिवंडी काँग्रेसचे अध्यक्ष माजी आ. राशीद ताहीर मोमीन आदी उपस्थित होते.