बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

संजय राऊताची भाषा कुठल्या लोकशाहीचं द्योतक ?

महाराष्ट्राच्या राजकारणात खा.संजय राऊत असे एकमेव नेते आहेत ज्यांच्या तोंडून चार-आठ दिवसाला शिवराळ भाषा असंसदीय बाहेर पडते. भाजपाच्या अनेक नेत्याबाबतीत त्यांनी खालच्या पातळीवर जावुन भाषेचा वापर केला. पण कालपरवा कडी करताना चक्क विधीमंडळाला चोरमंडळ म्हणून टाकले. वास्तविक पहाता शरदचंद्र पवारांना देखील ही भाषा आवडली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्यावर हक्कभंग आला आहे. समिती नियुक्त करून चौकशी सुरू आहे. उद्या हा विषय राज्यसभा आणि निर्णयासाठी उपराष्ट्रपतीकडे जाईल. मुळात या राजकिय नेत्याची एवढी हिंमत का होते?हाच खरा संशोधनाचा विषय. स्व.यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे एवढेच नव्हे तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, कै.केशवराव धोंडगे ही प्रतिभावंत मंडळी ज्या सभागृहातून पुढे आली त्याला चोरमंडळ म्हणणं याचाच अर्थ संजय राऊतांनी वर्तमान स्थितीत सभागृहात असलेल्या सदस्यांचाही अपमान करणं त्याहुन अधिक मरणोत्तर सदस्याचा अपमान करणं होय.मी म्हणजे वेगळा आणि काही पण करू शकतो हा अहंकारी स्वभाव खर्‍या अर्थाने मा.उद्धव ठाकरे यांच्यासाठी देखील आत्मघातकी बाँबच म्हणावा लागेल.

वर्तमान राजकिय स्थिती जर डोकावून पाहिली तर खर्‍या अर्थाने संत परंपरा असलेल्या महाराष्ट्राचं राजकारण अलीकडे वेगळ्या दिशेला जात असल्याचे लक्षात येतं. वैचारिक भावाचा अभाव कमी होत असुन एकमेकांना शिव्या घालणं यातच समाधान वाटताना दिसतं.त्याहुन अधिक अशी काही मंडळी केवळ राजकिय नैराश्यापोटी तोंडी येईल ती भाषा बोलुन जातात ज्याचे परिणाम समाज व्यवस्थेवर काय होतील?याची चिंता मुळीच त्यांना नाही. संजय राऊत एक संपादक म्हणून लेखणीच्या माध्यमातुन लिखाण स्वातंत्र्याचा निश्चित वापर करायचे. पण जेव्हा इ-मिडिया पुढे आली आणि एका रात्रीतुन माणुस प्रसिद्ध होवु लागला अशा वेळी बिनधास्त बोलण्याची काही नेत्यांना लागलेली सवय ज्यातून गलिच्छ राजकारण पुढे आलं. वास्तविक पहाता सर्वसामान्य लोकांनी अलीकडच्या काळात टिव्ही पाहण्याचं प्रमाण कमी होत चाललं असं म्हणायला हरकत नाही. संजय राऊत केवळ संपादक नाहीत तर राज्यसभा विचारवंत सभागृहाचे सदस्य देखील आहेत. कधी कधी प्रश्न असा पडतो विचारवंतांच्या सभागृहात खुर्चीवर बसणार्‍या सदस्यांच्या डोक्यात वैचारिक भुमिका असावी, शांत, संयम आणि जीभेवर सरस्वतीचं वास्तव्य कारण हे सदस्य वेगवेगळ्या क्षेत्रातून पुढे आलेले असतात. पण राज्यसभा सभागृहाची गरिमा साता समुद्रात खर्‍या अर्थाने राऊतांनी बुडवुन टाकली असं म्हणायला हरकत नाही. मागच्या चार-पाच वर्षात त्यांची विधानं अमंगळ, किळसवाणीच म्हणावी लागतील. मध्यंतरी किरीट सोमय्यांवर बोलताना तर माध्यमांच्या समोर कंबरेखालची भाषा त्यांच्या तोंडून बाहेर पडली. राजकारणात टिका टिप्पणी, निंदानालस्ती या गोष्टी घडणं साहजिकच. पण परस्परांचा एकेरी उल्लेख असेल किंवा व्यक्तीद्वेषाची भाषा नको त्या शब्दांत मांडून ओंगळवाणी चित्र लोकांच्या समोर उभा करणं याचाच अर्थ राज्यकर्त्याच्या माध्यमातून समाज आदर्श घेत असतो. तर मग अशांचा आदर्श कसा घ्यावा हाही प्रश्न पुढे येतो. संजय राऊत पत्राचाळ प्रकरणात जेलमध्ये गेले असतील. कदाचित बाहेर पडल्यापासून बिथरलेली भाषा हे सारं पाहिल्यानंतर आपण कुणाला कधीही घाबरत नाही हा अहंमपणा देखील व्यवस्थेला न शोभणारा वाटतो. आपण फार शाहु आणि समारेचा अगदी वेडा ही मानसिकता खर्‍या अर्थाने समाजात मतभेदाचे विष पेरणारी वाटते.

आतापर्यंत त्यांनी आरोप-प्रत्यारोप करताना केलेल्या भाषेचा वापर जनतेनं पाहिला त्याचा पुर्नउच्चार करण्याची गरज वाटत नाही पण ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली त्या आधारावर देशात आदर्श लोकशाही चालते. पण त्याच आदर्श लोकशाहीतील अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा किती गैरवापर करावा याचे भान देखील अशा नेतृत्वाच्या अंगी नसणे हे दुर्दैवच म्हणावे. राज्याच्या विधिमंडळाला देखील त्यांनी चोरमंडळ म्हटलं. खरं तर अगदी ठरवुन त्यांनी ही भाषा वापरली. गंमत बघा, लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचे आहेत? यापेक्षा सभागृह त्यात बसलेला लोकप्रतिनिधी निश्चितच प्रत्येक मतदारसंघात बहुमताने निवडुन आलेला असतो. लोकमत त्यांच्या पाठीशी असतं. राऊतांच्या दृष्टीने विधिमंडळ चोरमंडळ जर असेल तर मग सर्वसामान्य जनतेने मतदानरूपी आशिर्वाद देवुन चोरांनाच विधिमंडळात पाठवलं का? असा प्रश्न पडतो. वास्तविक पहाता केवळ सभागृहाचा अपमान राऊतांनी केला असं नव्हे. त्याहुन अधिक बोलायचं झालं तर ज्या सर्वसामान्य मतदारांनी आदर्श लोकशाही मार्गाने लोकप्रतिनिधीला निवडुन दिलं त्या सुज्ञ मतदारांचा देखील राऊतांनी अपमान केला असं म्हणावं लागेल. आपण काय बोलतो?, कुणावर बोलतो? याचं भान खर्‍या अर्थाने राजकिय पुढार्‍यांनी ठेवायलाच हवं. आता कितीही सारवासारव केली तरी विधिमंडळात बसलेले सारे चोर ठरवून सर्व पक्षाच्या सदस्यांना बदमाशाच्या यादीत टाकल्यासारखंच होय. मुळात एक गोष्ट कळत नाही या माणसाला नेमकं करायचं आहे काय? महाभारतात दुर्योधनाचा स्वभाव अशाच प्रकारचा होता. स्वत:ला अहंम समजणे आणि समोरचा कचरा समजणे ही राजकिय डोक्यातील हवा खर्‍या अर्थाने स्वत:च्या पक्षाला आणि नेतृत्वाला घातक तर निश्चित आहे त्याहून अधिक समाजव्यवस्थेला देखील घातक म्हणावी लागेल. कदाचित उद्या राऊत बोलण्यावर सारवासारव करतील.

हक्कभंगावरून त्यांना नोटीसा जातील. उत्तरही देतील. मी असं बोललोच नाही. नेहमीप्रमाणे बोलणं पुढे येईल पण बुँदसे गयी वह हौदोंसे नही आती. समाजात जो संदेश गेला त्याचा आदर्श कुणी काय घ्यावा आणि कसा घेईल? व त्याचे परिणाम भावी पिढीवर कसे होतील? याची चिंता वाटते. त्यांच्या बोलण्याचा राग केवळ शिंदे आणि भाजपालाच आला असा नव्हे. अधिवेशनात गदारोळ झाला तेव्हा विरोधी पक्ष नेते अजितदादा पवारांनी देखील नाराजी व्यक्त केली. सर्वच पक्षाच्या सदस्यांनी या बोलण्या विरोधात गदारोळ घातला होता. अर्थात आपण काहीही बोलु शकतो. कुणीच वाकडे करू शकत नाही.याच आविर्भावात पुन्हा संजय राऊतांनी काल पश्चिम महाराष्ट्रात निवडणुक आयोगावर शिवराळ भाषेत हल्ला चढवला. एक गोष्ट निश्चित आहे, ही मंडळी फार मोठ्या राजकिय नैराश्यात असुन असंंबंधित भाषा त्यांच्या तोंडून बाहेर पडणं त्याचाच भाग म्हणावा लागेल. देशात लोकशाही धोक्यात आली असं म्हणत विविध क्षेत्रातील मान्यवर छाती बदडून घेतात. साहित्य क्षेत्र असेल, कवी असतील, विरोधक उजवे, डावे, आडवे, पुरोगामी विचाराची मंडळी यांनी तर वर्तमान व्यवस्था धोक्याची असुन नरेंद्र मोदींनी लोकशाही जणु काही सुर्याच्या आड घेवुन जाण्याचा प्रयत्न चालवला असाच आरोप अनेकजण करताना दिसतात. पण या मंडळींना संजय राऊतांनी तोंडी वापरलेली भाषा, असंसदीय भाषेचा वापर करून व्यक्तिगत द्वेषाची गाठलेली सीमा आणि ज्यांच्या शिवराळ भाषेमुळे आदर्श लोकशाही धोक्यात येवु लागली त्या संजय राऊतांच्या विरोधात ही मंडळी का आवाज उठवत नाहीत? हा प्रश्न तितकाच चिंताजनक वाटतो.

बाकी काही असलं तरी विधिमंडळाला चोर म्हणुन ओरडणे ही भाषा कुठल्या आदर्श लोकशाहीचं द्योतक आहे? हे आता लोकशाही धोक्यात आली ज्यांना वाटतं त्यांनीच पुढे येवुन सांगावं.

– राम कुलकर्णी,
भाजप प्रवक्ता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button