दावोस जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार
गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरच सुरु होतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई
दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र गुंतवणूकदारांचे पसंतीचे राज्य असल्याचे ठळकपणे अधोरेखित झाले आहे, असे सांगून या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून उत्तम पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे. त्यामुळे उद्योजकांना मॅग्नेटिक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची संधी असून दावोसमध्ये महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी पसंती दर्शवली आहे. त्यासाठी त्यांचे आभार मानत त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
हायटेक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात ५४ हजार २७६ कोटी
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाची आणि महाराष्ट्राची छाप या आर्थिक परिषदेत दिसून आली. महाराष्ट्राच्या विविध औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक झाली असून त्यामध्ये हायटेक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात सहा कंपन्यांसोबत ५४ हजार २७६ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले आहे. त्याद्वारे ४३०० रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
ऊर्जा आणि इलेक्ट्रीकल व्हेईकल क्षेत्रात ४६ हजार ८०० कोटी
ऊर्जा क्षेत्रातील नविनीकरणीय ऊर्जा आणि इलेक्ट्रीकल व्हेईकल क्षेत्रात ४६ हजार ८०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामाध्यमातून ४५ हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
आयटी, फिनटेक, डेटा सेंटर या क्षेत्रामध्ये ३२ हजार ४१४ कोटी
माहिती तंत्रज्ञान (आयटी), फिनटेक, डेटा सेंटर या क्षेत्रामध्ये ३२ हजार ४१४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असून ८७०० जणांना रोजगार मिळणार आहे. लोह उत्पादन क्षेत्रात २२०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून ३००० जणांना रोजगार मिळणार आहे. कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रामध्ये १९०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले असून त्यामुळे सुमारे ६०० जणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली